जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मध्य प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणांहून जेसीबी, ट्रॅक्टरसह विविध वाहनांची चोरी करून ती तब्बल तीन लाख रुपयांच्या मोबदल्यात इतरांना वापरण्यासाठी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अनोख्या ‘भाडेपट्टी’ पद्धतीत न भाडे, न व्याज… फक्त एकदाच दिल्या जाणाऱ्या मोट्या रकमेत चोरीची वाहने हव्या तितक्या काळ वापरण्यास देण्यात येत होती.
ही मोठी कारवाई मध्य प्रदेशातील खरगोन पोलिसांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने शनिवारी ते रविवारी (२३ नोव्हेंबर) मध्यरात्रीपर्यंत संयुक्तरीत्या केली. कारवाईदरम्यान भाड्याने घेतलेली जेसीबी, मालवाहू वाहन आणि ट्रॅक्टर अशी वाहने जळगावातील विविध भागांतून जप्त करण्यात आली. याप्रकरणी जळगावातील दोघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले आहे.
तीन लाख देऊन चोरीची वाहने ‘भाड्याने’
मध्य प्रदेशातील मुख्य संशयित वाहन चोरी करून ती इतरांना तीन लाखांच्या एकरकमी रकमेवर वापरण्यास देत असे. या व्यवहारात कोणत्याही प्रकारचे मासिक भाडे किंवा व्याज घेतले जात नव्हते. वाहनांचा ‘अनलिमिटेड वापर’ मिळत असल्याने काही लोक या योजनेत आकर्षित होत होते. संशयिताच्या या नेटवर्कचा मागोवा घेताना पोलिसांना संपूर्ण रॅकेटचा छडा लागला.
जळगावातून वाहने जप्त
खरगोन पोलिसांच्या पथकाने रविवारी जळगावात पोहोचून स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर—
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपावरून जेसीबी,
एमआयडीसी परिसरातून एक मालवाहू वाहन,
नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रॅक्टर
अशी तीन वाहने जप्त करण्यात आली. ही सर्व वाहने मध्य प्रदेशातील विविध भागांतून चोरीस गेलेली असल्याची पुष्टी झाली आहे.
जप्त केलेली वाहने आणि ताब्यात घेतलेले दोन्ही जळगावातील आरोपी यांना अधिक चौकशीसाठी मध्य प्रदेशात नेण्यात आले आहे. या प्रकरणी खरगोन पोलिस ठाण्यात चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे आधीच नोंद आहेत. रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध वेगाने सुरू असून आणखी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या कारवाईमुळे मध्य प्रदेश–महाराष्ट्र सीमेवर चालणाऱ्या वाहन चोरीच्या रॅकेटला मोठा तडा गेला असून प्रकरणाने दोन राज्यांच्या पोलिसांना सतर्क केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा