Top News

मोठी बातमी! आकाशवाणी चौकातील सर्कलवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रतीकात्मक आंदोलन

उपरोक्त गवत व कचऱ्यावर तननाशक फवारणी; मनपा व NHAI अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा निषेध

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील सर्कलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असून कचऱ्याचा साठाही वाढलेला आहे. सर्कल मोडकळीस आलेले असून व्यवस्थापनाचा पूर्ण अनागोंदीपणा नागरिकांना सहन करावा लागत आहे. या अत्यंत गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज आकाशवाणी चौकात प्रतीकात्मक आंदोलन छेडण्यात आले.

आज घेण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सर्कलमधील उगवलेल्या गवतावर पंपाद्वारे खास तननाशक रसायनाची फवारणी केली. तसेच सर्कल परिसरात साचलेला कचरा एकत्रित करून एका बाजूला करण्यात आला. या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जळगाव महानगरपालिका तसेच नॅशनल हायवे अथॉरिटी (NHAI) च्या अधिकाऱ्यांच्या कामचुकार वृत्तीचा जोरदार निषेध नोंदवला. आकाशवाणी चौकातील सर्कलबरोबरच इच्छा देवी चौक व अजिंठा चौकातील सर्कलचीही साफसफाई व योग्य देखभाल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुढील काळात पुन्हा गवत उगवू नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, सर्कलचे सौंदर्य व स्वच्छता राखावी, तसेच मनपा व एनएचएआयने तातडीने काम हाती घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

आंदोलनात प्रमुख उपस्थित:
शहराध्यक्ष इजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अशोक लाडवांजारी, सचिव सुनील माळी, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, विद्यार्थी अध्यक्ष गौरव वाणी, उपाध्यक्ष किरण राजपूत, कलाबाई शिरसाट, माजी नगरसेवक राजीव मोरे, दुर्गेश पाटील, रहीम तडवी, मतीन सय्यद, गौरव डांगे, अखिल पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने