Top News

खेडी खुर्द–धानोरा परिसरात अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई; १ हजार ब्रास वाळू जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील खेडी खुर्द आणि धानोरा शिवारात अवैधरित्या उत्खनन करून साठवून ठेवलेला सुमारे एक हजार ब्रासपेक्षा जास्त वाळूचा साठा गौण खनिज विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रार मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश देत नायब तहसीलदार रुपाली काळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केले.

काळे व त्यांच्या पथकाने खेडी खुर्द व धानोरा परिसरात तपासणी केली असता, गिरणा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा केलेला वाळू साठवून ठेवलेला आढळून आला. त्यानंतर पथकाने रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्तात हा साठा ताब्यात घेण्याची जप्ती प्रक्रिया सुरू ठेवली. जप्तीची कारवाई सुरळीतपणे व्हावी यासाठी पोलीस पथकही घटनास्थळी उपस्थित होते.

या प्रकरणात जागा मालक, संबंधित विभागातील अधिकारी–कर्मचारी आणि अन्य जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची व नोटिसा बजावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाढत्या अवैध वाळू उत्खननामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने