जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तेलंगणाहून जळगाव जिल्ह्याकडे मोटारीने निघालेल्या एका दाम्पत्याचा रहस्यमय बेपत्ता होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवासादरम्यान त्यांचा केवळ नातेवाईकांशीच नव्हे, तर मोबाईलवरील संपर्कही पूर्णपणे खंडित झाला. पोलिस तपासात पाटील दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी परिसरात आढळल्याने प्रकरण अधिक गडद बनले आहे.
या संदर्भात संदीप पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे चुलतबंधू पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणातील सीतापुरम येथील एका खाजगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहेत. ते पत्नी नम्रता आणि मुलीसह २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जळगाव जिल्ह्यातील डोकलखेडा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी कारने निघाले होते. घरातून निघाल्यानंतर चुलतभावाशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले. नियोजनानुसार रात्री १० वाजेपर्यंत ते जळगावला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र त्या वेळेनंतर त्यांचा सर्व संपर्क तुटला.
वारंवार प्रयत्न करूनही पद्मसिंह व त्यांच्या पत्नीचा मोबाईल बंद येत असल्याने नातेवाईकांची चिंता वाढत गेली. २७ नोव्हेंबरपासून कुटुंबीयांनी सतत फोन, सोशल मीडियावर शोध, तसेच मार्गावरील ओळखीच्या ठिकाणी चौकशी करून पाहिली; पण दाम्पत्याचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर परिस्थिती गंभीर झाली असून तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवताना मोबाईल लोकेशनची तपासणी केली. त्यात दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन खामगाव–मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी परिसरात असल्याचे समोर आले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर लगेचच त्यांचे फोन बंद झाले होते. या मार्गावर त्या काळात कोणताही अपघात घटना घडलेली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे पाटील दाम्पत्यावर कुठल्यातरी प्रकारचा घातपात झाल्याचा संशय गडद होत असून, पोलिसांनी सर्व दिशांनी तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबात तीव्र भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे.
टिप्पणी पोस्ट करा