जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्णपेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (वय ३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) या लेडी स्नॅचरला शनिपेठ पोलिसांनी बरेलीमधून जेरबंद केले आहे.
पोलिस तपासात उघड झाले की, चोरीची आयडिया तिला युट्यूबवरील व्हिडिओ, ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ आणि इतर क्राईम स्टोरीज पाहून मिळाली. तसेच सुवर्णपेढ्या शोधण्यासाठी ती गुगल मॅपचा वापर करीत होती.
घटना अशी उघडकीस आली :
ऑक्टोबर महिन्यात खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन हातचालाखी करत तिने सोन्याच्या अंगठ्या लांबवल्या होत्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसल्यानंतर जिल्हापेठ व शनिपेठ पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तांत्रिक तपासाच्या आधारे ही महिला उत्तरप्रदेशातील बरेली येथे असल्याचा सुराग मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तिला अटक केली.
चोरीची अनोखी ‘टेक्निक’ :
तपासात या महिलेने अनेक धक्कादायक माहिती उघड केली. विविध ज्वेलरी शोरुममधील दागिन्यांना लावलेले क्यूआर कोड टॅग ती चोरत असे. तसेच दुकानदारांनी बाहेर फेकलेल्या कचऱ्यातूनही तीने दागिन्यांचे टॅग गोळा केले होते. हे टॅग ती बनावट अंगठ्यांना लावून, खऱ्या अंगठ्या बदलून घेऊन पळ काढत असे. गेल्या दहा वर्षांपासून तीने अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचेही समोर आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा