Top News

जळगाव आरटीओमधील धक्कादायक प्रकार उघड; ‘पैसे दिल्याशिवाय लायसन्स मिळत नाही’ – नागरिकांचा संताप

पैसे दिले तरच लायसन्स? जळगाव आरटीओतील भोंगळ कारभार उघड

कायदा धाब्यावर? जळगाव आरटीओत वाहन चाचणीऐवजी ‘पैसे घेऊन पास’ मोहीम सुरू 

कॉम्प्युटर परीक्षा सुद्धा पैशावर!, नागरिकांनी केली जळगाव आरटीओची तक्रार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आरटीओ कार्यालयातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चारचाकी किंवा दुचाकी चालक परवाना (DL) काढण्यासाठी नागरिकांकडून सर्रास पैसे उकळले जात असल्याचे धक्कादायक आरोप समोर आले असून, पैसे न दिल्यास परवाना मिळत नसल्याचा नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे.

नागरिकांच्या मते, लायसन्स मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला वाहन चालवता येत असो वा नसो, फक्त पैसे दिले की परवाना मंजूर केला जातो. त्याउलट, ज्यांना वाहन नीट चालवता येत नाही किंवा वाहतूक नियमांची जाण नाही, अशा व्यक्तींना प्रत्यक्ष चाचणी न घेता परवाने देण्यात येत असल्याने अपघातांच्या धोक्यात वाढ होत आहे.

आरटीओ बाहेरील एजंटांपासून ते कार्यालयातील काही अधिकाऱ्यांपर्यंत ‘पैसा दिला तर काम’ अशीच पद्धत सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. परवाना प्रक्रियेत महत्त्वाची असलेली संगणकावरची परीक्षा देखील पैशांच्या जोरावर पास करून दिली जाते, इतकी मोठी अनियमितता या ठिकाणी सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांचा सवाल
“परवाना देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला वाहन चालवता येते का, त्याला नियमांची माहिती आहे का, हे अधिकारी का तपासत नाहीत? उलट पैसे घेत परवाने देऊन ते स्वतःच अपघातांना आमंत्रण देत आहेत,” असे एक नागरिक म्हणाले.

यामुळे आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार व भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाहनचालक परवाना ही अत्यंत गंभीर व सुरक्षा संबंधित प्रक्रिया असूनही पैशांच्या आधारावर परवाने दिले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून या भ्रष्टाचारावर अंकुश आणावा, तसेच वाहनचालक परवाना खऱ्या पात्र व्यक्तीलाच मिळावा यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने