Top News

मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गांजा लागवडीवर LCB व पोलिसांची धडक कारवाई

गोपनीय माहितीच्या आधारे LCB व मुक्ताईनगर पोलिसांची धाड; लाखो रुपये किमतीची झाडे जप्त व नष्ट

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मुक्ताईनगर तालुक्यातील माणगाव शिवारात केळीच्या बागेआड लपवून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध गांजाची लागवड जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त केली आहे. बुधवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी २ वाजता झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याला मोठा धक्का बसला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई
माणगाव शिवारात गांजाची शेती सुरू असल्याची गोपनीय माहिती LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, LCB आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तपणे शेतावर धाड घातली.

केळीच्या झाडांमध्ये लपवलेली गांजाची शेती
धाडीदरम्यान पोलिसांना केळीच्या झाडांच्या दाटीत कौशल्यपूर्णपणे लपवून ठेवलेली गांजाची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आढळली. लाखो रुपयांपर्यंत किंमत असू शकणारी ही झाडे पोलिसांनी तात्काळ नष्ट केली. तसेच पुराव्यासाठी काही नमुने जप्त करण्यात आले.

कारवाईनंतर परिसरात खळबळ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण गुप्तता ठेवून ही कारवाई करण्यात आली. हा अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून, त्याला अटक करण्यासाठी मुक्ताईनगर पोलीस कार्यवाही पुढे चालू ठेवत आहेत. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने