मनपाचे ५-६ अग्निशामक बंब घटनास्थळी; आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील एमआयडीसी परिसरातील आर.एल. चौफुलीजवळ असलेल्या ‘आर्यव्रत’ या कंपनीला आज (शुक्रवार) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की अवघ्या काही मिनिटांत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी तत्काळ महानगरपालिकेचे ५ ते ६ अग्निशामक बंब दाखल झाले असून जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे टँकर, होज पाइप्स आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर करीत बचावकार्य सुरू आहे.
सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र कंपनीतील तयार माल, कच्चा माल व इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विद्युत शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आहे. कर्मचार्यांची चौकशी, पंचनामा आणि आग कशामुळे लागली याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
ही आग घटना एमआयडीसी परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली असून औद्योगिक क्षेत्रातील इतर उद्योगपतींमध्येही यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा