Top News

जळगावातील चार शाळांवर चोरट्यांचा धुमाकुळ: १ लाख ९४ हजारांची रोकड लंपास

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात चोरट्यांनी एका नव्हे तर तब्बल चार शाळांवर धाड टाकत तब्बल १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही साखळी चोरी घडली असून, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनांची छायाचित्रफीत (CCTV फुटेज) पोलिसांच्या हाती लागली असून, यात मुखवटे व स्कार्फ बांधलेल्या तरुण मुली तसेच एका तरुणाचा सहभाग स्पष्ट दिसत आहे.

वर्धमान CBSE इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक आशिष चंद्रकांत अजमेरा (वय ५३, रा. हरेश्वर नगर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
शाळेतील विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची एकूण १ लाख ३५ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले. अजमेरा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असताना, त्याच परिसरातील इतर तीन शाळांमधूनही चोरी झाल्याचे उघड झाले. त्या शाळा पुढीलप्रमाणे – जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल — ४५,००० रुपये, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग विद्यालय — १३,००० रुपये, गुरुकुल किड्स — १,००० रुपये यामुळे एकूण १ लाख ९४ हजारांची रोकड लंपास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

CCTV मध्ये तरुणी व तरुणांचा सहभाग 
घटनास्थळावरील सर्व CCTV फुटेज पोलिसांनी तपासले असून, वर्धमान शाळेच्या फुटेजमध्ये स्कार्फ बांधलेल्या संशयित तरुणी दिसतात. गुरुकुल किड्सच्या फुटेजमध्ये दोन तरुणी व एक तरुण मास्क व स्कार्फ घालून फिरताना दिसले. यामुळे ही चोरी तरुण-तरुणींच्या टोळीने नियोजनपूर्वक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्या चार शाळांमध्ये चोरी झाली, त्या सर्व शाळा मुख्य शहरापासून दूर व विरळ लोकवस्तीच्या परिसरात आहेत. रात्रीच्या वेळी या भागात ये-जा कमी असल्याने चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतल्याचा शक्यता तपासली जात आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ११ लाख रुपये चोरट्यांनी लांबवले होते. त्यामुळे या परिसरात चोरट्यांचे हात भरण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे.

सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२५ वाजता अजमेरा शाळेत पोहोचले तेव्हा त्यांना मुख्य व दुसऱ्या ग्रिल गेटची कुलुपे तुटलेली दिसली. सुरक्षा रक्षकांशी चौकशी करून ते थेट अॅडमिन रूममध्ये गेले असता, कपाटे आणि स्टील पेट्यांचे कुलूप फोडून संपूर्ण रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनांचा तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. CCTV फुटेजचे विश्लेषण, परिसरातील हालचालींची तपासणी आणि स्थानिक माहितीदारांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांना लवकरच आरोपींचा ठावठिकाणा लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने