Top News

एमआयडीसीमध्ये धाडसी चोरी : कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे फेकून १० लाखांची रोकड लंपास

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. कंपनीकडून १० लाखांची रोकड घेऊन परतत असलेल्या कुरीयर बॉयवर दोन अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून रोकडची बॅग पळवून नेली. रेमंड चौकाजवळ बीएचआर पतसंस्थेच्या कार्यालयासमोर ही घटना घडली.

मोबाइलवर बोलण्यासाठी थांबला व लगेच झाली लूट
सायंकाळच्या सुमारास एमआयडीसीतील एका तेलाच्या कंपनीतून १० लाख रुपयांचे पेमेंट घेऊन कुरीयर बॉय दुचाकीवरून जुने बसस्थानक परिसराकडे निघाला होता. याचवेळी त्याच्या मालकाचा फोन आला त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला थांबून कॉल रिसिव्ह करत होता.

दरम्यान, दोन दुचाकीस्वार चोरटे तेथे आले. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कुरीयर बॉयच्या डोळ्यांत मिरची स्प्रे फेकला. अचानक डोळ्यांत जळजळ व वेदना सुरू झाल्याने तो सावरायचा प्रयत्न करत असतानाच चोरट्यांनी दुचाकीला बांधलेली रोकडची बॅग हिसकावली आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने पलायन केले.

पोलीस पथकाची धावपळ – सीसीटीव्ही तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. कुरीयर बॉयची चौकशी करण्यात आली असून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. उच्च रकमेची चोरी मध्यवर्ती औद्योगिक क्षेत्रात झाल्याने व्यापारी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने