सरदार वल्लभभाई पटेल भवनात सत्ताधाऱ्यांचे कार्यालय? नियमबाह्य वापराचा आरोप!
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल भवन (लेवा भवन) या मनपा मालकीच्या शासकीय जागेत थेट सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भात माजी नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी थेट जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सरदार वल्लभभाई पटेल भवनात कार्यालय उघडल्याची पोस्ट आणि रील शेअर केली. संबंधित पोस्टमध्ये त्यांनी हे कार्यालय उद्घाटन झाल्याचे नमूद केले असून, ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचेही सर्वश्रुत आहे.
तक्रारीत ॲड. पियुष पाटील यांनी नमूद केले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल भवन ही मनपा मालकीची जागा असून ती एका संस्थेला कराराच्या अटींवर देण्यात आलेली आहे. या करारानुसार सदर ठिकाणावर कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यालय चालविण्यास किंवा राजकीय उपक्रमासाठी वापरण्यास मनाई आहे. मात्र, या अटींचे उल्लंघन करत शिंदे गटाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार देत सदर कार्यालय तात्काळ मनपा अतिक्रमण विभागामार्फत जप्त करावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या घडामोडीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आता मनपा प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा