Top News

जळगावातील वरिष्ठ पत्रकार यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला — सीसीटीव्हीत मारेकरी कैद

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील प्रसारमाध्यम क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे. शहरातील प्रतिष्ठित दै. लोकशाही या वृत्तपत्रात कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार दीपक कुलकर्णी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास दीपक कुलकर्णी हे बळीराम पेठ येथील लोकशाही कार्यालयात पायी जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या तीन जणांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींपैकी एकाने हातातील काचेची बॉटल त्यांच्या मानेवर फेकत मारली. सुदैवाने कुलकर्णी यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव केला, तरीदेखील त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ कुलकर्णी यांना जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, जेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी गुन्ह्याची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हल्ला करणारे संशयित तिघेही घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाले आहेत. पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार संघटना व सहकारी पत्रकारांनी हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, शहरात वाढत्या पत्रकार हल्ल्यांच्या घटनांबद्दलही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने