मुक्ताईनगर, प्रतिनिधी I मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी दुपारी तापी नदीकाठी वाळूचे ट्रॅक्टर कलंडल्याने ट्रॉलीखाली दबून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी (२७ ऑक्टोबर) सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली.
मृत तरुणाचे नाव तोहीत शाह इस्माईल शाह (वय २१, रा. पिंपरीनांदू) असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव अनिकेत संदीप इंगळे (वय २०, रा. पिंपरीनांदू) असे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी सलीम शाह करीम शाह (वय ३९, रा. पिंपरीनांदू) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तोहीत शाह आणि त्याचा परिवार मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता तोहीत शाह हा मजुरीसाठी ट्रॅक्टर घेऊन तापी नदीकाठावर गेला होता. तेथे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरल्यानंतर तो ट्रॉलीवर बसून गावाकडे परतत असताना, दुपारी १२.१५ वाजता ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन कलंडले.
या दुर्घटनेत ट्रॉलीखाली दाबून तोहीत शाहचा जागीच मृत्यू झाला, तर अनिकेत इंगळे हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मोहन कुंभार यांच्या विटभट्ट्याच्या बाजूला, नदीकाठावर झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले व जखमींना ट्रॉलीखालून बाहेर काढले. दोघांनाही तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तोहीत शाह याला मृत घोषित केले, तर अनिकेत इंगळे याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची नोंद मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा