जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीला जळगावकर रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता पार पडलेल्या या संगीत मैफलीत प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत आणि अभंगवाणीने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदनाने झाली. जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केलेल्या गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरेख सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे आणि आजचे उत्सवमूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनघा नाईक-गोडबोले यांनी केले.
संगीत प्रवासाची सुरुवात १८८२ सालापासूनच्या नाट्यसंगीत वारशाने झाली. डॉ. आफळे यांनी "पंचतुंड नर रुंड माल धर" या नांदीने वातावरण भारावून टाकले. त्यानंतर ‘मानापमान’ नाटकातील “चंद्रिका ही जणू” हे पद आणि ‘संत कान्होपात्रा’ मधील “पतीत तू पावना” या भावस्पर्शी नाट्यपदांनी उपस्थितांची मनं जिंकली.
यानंतर ‘रणदुंदुभी’ मधील “दिव्य स्वातंत्र्य रवी”, ‘देव दिना घरी धावला’ मधील “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी”, आणि ‘मत्स्यगंधा’ मधील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” या नाट्यपदांनी प्रेक्षकांना रसिकतेच्या उत्कर्षबिंदूपर्यंत नेले. शेवटी ‘कट्यार काळजात घुसली’ मधील “तेजोनिधी लोह गोल! भास्कर हे गननराज” आणि “सुरत पिया की छिन् बिसुराये” या लोकप्रिय नाट्यपदांनी रसिकांना भारावून टाकले.
कार्यक्रमाची सांगता “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भावपूर्ण भैरवीने करण्यात आली. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या सुरेल मैफलीत रसिक क्षणभरही उठले नाहीत, इतका मोहक अनुभव सर्वांना लाभला.
या प्रसंगी जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. शहरातील अनेक मान्यवर व रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, वरूण देशपांडे आणि अनघा नाईक-गोडबोले यांनी परिश्रम घेतले. या मैफिलीस कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
जळगावच्या सांस्कृतिक परंपरेचा हा सुंदर सोहळा नववर्षाच्या पहाटे रसिकांना एक सुरेल भेट ठरला.
टिप्पणी पोस्ट करा