Top News

मोठी बातमी I रामानंदनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सोन्याच्या चोरीतील आरोपी गजाआड

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिसांनी तब्बल आठ वर्षांपूर्वी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत संशयित आरोपीला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १० तोळे (१०० ग्रॅम) वजनाचे, सुमारे ११ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०१७ रोजी फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर.एल. कॉलनी, गांधी नगर, जळगाव) यांच्या मालकीच्या साई ज्वेलर्स या पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केटमधील दुकानात सुशांत सुनिल कुंडु (वय ३९, रा. नस्करपारा, संत्रागाच्छी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) हा कामगार म्हणून कार्यरत होता. या दरम्यान त्याने दागिने तयार करण्यासाठी दिलेल्या सुमारे ३० तोळे सोन्याचा अपहार करून पलायन केले होते.

या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२/२०१७ भा.द.वि. कलम ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीचा त्याच्या मूळ गावी तसेच विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र तो फरार असल्याने प्रकरण कायम तपासावर ठेवण्यात आले होते.

अखेरीस पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वाराणसी, उत्तर प्रदेश येथून संशयित आरोपी सुशांत कुंडु यास ताब्यात घेतले. त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यास जळगाव येथे आणून अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून पश्चिम बंगालमधून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले.

कारवाईत सहभागी अधिकारी :
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय भूषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, पोलिस नाईक योगेश बारी, अनिल सोननी व अतुल चौधरी यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने