जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि नात्यांचा सण. मात्र समाजातील काही घटक असे आहेत, ज्यांना या आनंदाचा, आपुलकीचा स्पर्श अनेकदा लाभत नाही. अशा गरजू आणि बेघर बंधूंना मनाचा आधार देत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रात भाऊबीज साजरी करण्यात आली.
‘रक्ताची नाती नसली तरी मनातील नाती जुळू शकतात’ हे भावनिक वास्तव साकार करत नारीशक्तीच्या बहिणींनी या विशेष दिवशी बेघर बंधूंना ओवाळले, भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. भाऊबीज हा फक्त भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाच्या वचनाचा उत्सव आहे. या अर्थाने नारीशक्तीने समाजातील आधारविहीन घटकांना ‘मनाचा आधार’ देण्याचा सुंदर संकल्प केला.
या अनोख्या उपक्रमादरम्यान नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा किशोर पाटील यांनी सांगितले की, “आमच्या संस्थेचा उद्देश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रेम आणि सन्मान पोहोचवणे आहे. ज्यांना कोणी नाही, त्यांच्यासाठी आम्ही आहोत — ही आमची भावना आहे.”
कार्यक्रमास ए. बी. पी. माझाचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर नेवे, आशा मौर्य, नेहा जगताप, हर्षा गुजराती, किशोर पाटील, सेजल वनरा, शितल काटे तसेच बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी उपस्थित होते. केंद्राच्या वतीने संस्थेच्या या उपक्रमाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
भाऊबीज निमित्त नारीशक्तीच्या बहिणींनी जेव्हा बेघर बंधूंच्या कपाळावर ओवाळणी केली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंनी या नात्याची खरी ओळख दिली — रक्ताची नाही, पण मनाची नातीही तेवढीच पवित्र असतात.
टिप्पणी पोस्ट करा