जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील बिग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी थरारक कारवाईत ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून ही कारवाई २३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बिग बाजारकडे जाणाऱ्या रोडवरील दोस्ती बिअर शॉप समोरील सर्कलजवळ एक व्यक्ती हातात गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यांनी तातडीने सपोनि सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक त्या ठिकाणी रवाना केले.
सपोनि आव्हाड, सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ सतीश पाटील, उमेश भांडारकर, योगेश पाटील, दिपक शिरसाठ, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, भगवान पाटील, पोलीस नाईक भगवान मोरे, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि राहुल पांचाळ या पथकाने तत्परतेने कारवाई करत संशयित हर्षल कदम याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक अमोल अशोक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दीपक सुरवळकर करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा