मणियार बंधूंवरची कारवाई थांबली; पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय, पोलिस निरीक्षक संदीप पाटील प्रकरण अजूनही गूढच
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहरात गेल्या तीन दिवसांपासून आयुष कमलकिशोर मणियार व पियुष कमलकिशोर मणियार हे दोघे बंधू खुलेआम फिरत असून, त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कुठेतरी सेटलमेंट झाल्याचे निष्पन्न होत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
शस्त्र परवाना मंजुरीवर प्रश्नचिन्ह
या मणियार बंधूंना शासनाने यापूर्वी शस्त्र परवाना नाकारला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे, उप विभागीय अधिकारी कुमार चिंता व एमआयडीसी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी या अर्जाला नकार दिला होता. कारण म्हणून त्यांच्या जीवावर कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र, अधिकारी बदलताच परिस्थिती बदलली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यकाळात आणि त्याचवेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी जयपाल हिरे यांच्या सकारात्मक रिमार्कच्या आधारे या बंधूंना शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, उपअधिक्षक संदीप गावीत व पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या टीमने देखील हे प्रकरण पुढे नेले. अखेरीस जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शस्त्र परवाना मंजूर केला.
दहशत पसरवल्याच्या तक्रारी
शस्त्र परवाना मिळाल्यानंतर हे बंधू कमरेला पिस्टल खोचून समाजात दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मिळाल्याचा दावा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. त्यांनी सन 2023 मध्येच शासन दरबारी या शस्त्र परवान्याचा पुनर्विचार करून रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी आजही प्रलंबित आहे.
राजकीय पातळीवर मागणी
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील मणियार बंधूंचा शस्त्र परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. "विशी ओलांडलेले आणि पचविशीच्या आतील हे तरुण समाजहिताचे असे कोणते उद्योग करतात की ज्यामुळे त्यांना जीवाची भीती निर्माण झाली आहे?" असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस प्रशासनावर संशय
तीन दिवस उलटूनही या बंधूंवर कारवाई न झाल्याने पोलिस प्रशासन कुठेतरी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा थेट प्रश्न उपस्थित झाला आहे. जनतेमध्ये “खाकी डागाळली का?” अशी चर्चा सुरू असून, अधिकारी मौन बाळगत असल्याने संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
जनतेचे अनुत्तरित प्रश्न
एकदा नाकारलेला शस्त्र परवाना पुन्हा मंजूर कसा झाला? अपील प्रक्रियेला बगल देऊन सरळ मंजुरी कशी मिळाली? अधिकारी बदलताच निर्णयात फेरफार का झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे अजूनही जनतेपुढे आलेली नाहीत.
एलसीबीचे संदीप पाटील प्रकरण अजूनही गूढच
जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेले गंभीर आरोप अजूनही चर्चेत आहेत. मात्र, या आरोपांबाबत अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे “खरा प्रकार नेमका काय?” हा प्रश्न जनतेतून विचारला जात असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या दोघांवर कारवाई न झाल्याने संशयाचे वातावरण असून, प्रशासनातील ‘सेटलमेंट’वरून जोरदार चर्चा रंगली आहे.
टिप्पणी पोस्ट करा