Top News

जळगाव महापालिकेत एसीबीची मोठी कारवाई : दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. महापालिकेतील लिपिक आनंद जनार्दन चांदेकर व कंत्राटी कर्मचारी राजेश रमण पाटील या दोघांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

एका कर सल्लागार संस्थेतर्फे आधुनिक सार्वजनिक शौचालयाच्या टेंडरसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. टेंडर न मिळाल्याने संस्थेची ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम परत मागितली होती. मात्र, लिपिक आनंद चांदेकर यांनी ती रक्कम परत मिळवून देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत १९ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून मागितलेले ५,००० रुपये चांदेकर यांनी स्वीकारले व ती रक्कम राजेश पाटील यांच्याकडे देण्यास सांगितली. त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.

या कारवाईत पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांचे पथक सहभागी होते. आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू आहे.

एसीबीचे नागरिकांना आवाहन
शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
📞 दूरध्वनी – ०२५७-२२३५४७७ | टोल फ्री : १०६४

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने