शिरपूरमध्ये आदिवासींच्या मूकमोर्चानंतर तणाव
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शिरपूर येथे आदिवासी बांधवांचा मूकमोर्चा संपल्यानंतर शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्ससमोर बेकायदेशीरपणे रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी वारंवार समजावून सांगितल्यावरही जमाव आक्रमक झाला. याच दरम्यान लाल रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने अचानक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर धारदार शस्त्राने पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली.
संतप्त जमावाने इतर पोलिसांनाही धक्काबुक्की केली. तत्काळ पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कारवाई केली. जखमी निरीक्षक हिरे यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे रात्री शिरपूरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या व सुरक्षा वाढविण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, नाशिक विभागाचे आयजी दत्तात्रेय कराळे यांनीही घटनेची माहिती घेतली. शहर व सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावातील अनिल सिताराम पावरा (२०), सागर जहागीरदार पावरा (२०), दिनेश रमेश पावरा (१९), सुनिल लोटन सोनवणे (२३), राहुल संजय भिल (१९), कुणाल सुभाष भिल (१९) व जगन सतीष भिल (१९) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी जगन भिल याच्यावर पोलीस निरीक्षक हिरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.
जखमी निरीक्षक हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आदी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिरपूर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा