जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात अचानक वळण लागले आहे. तक्रार देणार असल्याचे सांगणारी संबंधित महिला आता आपल्या तक्रारीवर ठाम राहिली नाही.
शुक्रवारी (२९ ऑगस्ट) दुपारपासून एमआयडीसी पोलिस ठाण्यात ती महिला हजर होती. तिने अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. संध्याकाळी तक्रार नोंदविण्याऐवजी "उद्या येते" असे सांगून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी, शनिवारी दिवसभर तिची वाट पाहूनही ती परत आली नाही. नंतर संपर्क साधल्यावर महिलेने "माझी कोणतीही तक्रार नाही, मात्र मी स्वतः लेखी निवेदन देईन," असे पोलिसांना कळवले. मात्र शनिवारी उशिरापर्यंत ती पोलिस ठाण्यात दाखल झाली नव्हती, अशी माहिती एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली.
आमदार मंगेश चव्हाण यांचे आरोप
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करून संदीप पाटील यांच्यावर थेट गंभीर आरोप लावले. त्यानंतर आमदार स्वतःही पोलिस ठाण्यात गेले होते. महिला देखील ठाण्यात हजर होती. परंतु तक्रार न देता अचानक घरी परतल्याने या प्रकरणाबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
संदीप पाटील आता वैद्यकीय रजेवर
आरोप उघड झाल्यानंतर संदीप पाटील यांना पदावरून तातडीने हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी १५ दिवसांची वैद्यकीय रजा घेतली आहे.
दोन जणांचा शोध
या प्रकरणात पाटील यांना दोन जणांनी साथ दिल्याचा उल्लेखही आमदार चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या शस्त्र परवान्याबाबत तसेच व्यवसायाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चौकशीसाठी या दोघांना पोलिसांनी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते जळगाव शहर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा