चोपडा – श्री साईं ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळ, यावल रोड चोपडा यांच्या वतीने आयोजित “साईं-आराध्य” गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुणालभाऊ जगताप तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा पार पडला.
गेल्या १६ वर्षांपासून सलगपणे श्री गणेशोत्सवाचे आयोजन करून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरलेल्या या मंडळाने यंदा १७ वे वर्ष पूर्ण केले. या निमित्ताने मंडळाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेशमूर्तीची निर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तब्बल ३५ फूट उंचीची भव्य मूर्ती उभारून “साईं-आराध्य” गणेशोत्सवाने चोपड्याचा राजा हा किताब खऱ्या अर्थाने आपल्या नावावर केला आहे.
ही भव्य मूर्ती बुरहानपूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार गायत्री आर्ट्स यांनी साकार केली असून, पार्श्वभूमी (बॅकग्राऊंड सेट) मुंबईतील नामांकित परेल वर्कशॉप मधून खास बनवून आणण्यात आली आहे. पारंपरिक कलाकुसरीबरोबर आधुनिक सजावटीचा सुंदर मेळ साधणारा हा देखावा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर पहिल्याच दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली दिसते. सर्वत्र “चोपड्याचा राजा” या नावाने गणरायाला हाक देण्यात येत असून, स्थानिकांसह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री साईं ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळाच्या या भव्य आयोजनामुळे चोपडा शहरात गणेशोत्सवाला विशेष रंग चढला असून, भाविकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही अविस्मरणीय सोहळ्याचा अनुभव मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा