Top News

क्रिकेटच्या वादातून वृद्ध महिलेसह तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण; चार जणांवर गुन्हा

जळगाव - कालिंका माता मंदिर परिसरात घडली घटना

शहरातील कालिंका माता मंदिराजवळ शनिवारी रात्री लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलगा आणि सून यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली असून, याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी, ३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताराबाई सुकलाल शिंदे (वय ६०, रा. कालिंका माता मंदिर परिसर, जळगाव) या आपल्या मुलगा एकनाथ शिंदे आणि सून सुनिता शिंदे यांच्यासोबत राहतात. शनिवारी रात्री मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून वाद निर्माण झाला. या वादातून शेजारी राहणारे सुनिता आवल्या शिंदे, विजू पिंटू शिंदे, अमोल सुकलाल साळुंखे आणि देविदास लाला सोळुंखे (सर्व रा. कालिंका माता मंदिर परिसर) यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने तिघांवर हल्ला केला.

या मारहाणीत ताराबाई शिंदे, एकनाथ शिंदे व सुनिता शिंदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेनंतर वृद्ध महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वंजारी करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने