जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील अजिंठा चौकात दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले व्यापारी योगेश गोविंद चंदनकर (वय ५२, रा. शिवकॉलनी) यांचे सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात आले असून, त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली ही इच्छा पूर्ण करून कुटुंबीयांनी मानवतेचे मोठे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
चंदनकर यांची औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) स्वतःची कंपनी आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ते आपल्या कंपनीत जात असताना अजिंठा चौकात एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या पायावरून डंपरचे चाक गेले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
चंदनकर हे काथारवाणी समाजाचे माजी अध्यक्षही होते. त्यांचा समाजात मोठा वावर असून अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय होते. त्यांच्या निधनाने व्यापारी आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांची नेत्रदानाची इच्छा पूर्ण केली असून, हे नेत्रदान अन्य दोन व्यक्तींना नवदृष्टी देणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा