Top News

जळगावात गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कडक कारवाई; सचिन उर्फ टिचुकल्या चौधरी नागपूर कारागृहात रवाना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्हा पातळीवरील गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने एक पाऊल पुढे टाकले असून, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्दम्य गुन्हेगार सचिन ऊर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६, रा. गणेशवाडी, तुकारामवाडी, जळगाव) याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधात्मक धोरण अंतर्गत एम.पी.डी.ए. कायद्यानुसार (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंध अधिनियम) कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सदर आरोपीविरुद्ध भादंवि अंतर्गत तब्बल ९ गुन्हे दाखल असून, तो झोपडपट्टी दादागिरी, हातभट्टी विक्री, औषधद्रव्य संबंधी गुन्हे, व्हिडीओ पायरेटिंग, वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार यासारख्या गंभीर आणि समाजविघातक गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे. त्याच्या गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्थेला कायमची बाधा निर्माण झाली होती.

या कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तयार केलेला प्रस्ताव दि. १६ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० जून २०२५ रोजी आदेश क्रमांक दंडप्र/कावि/एमपीडीए/०१/२०२५ नुसार सचिन चौधरी यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, सहा. पो.नि. संतोष चव्हाण, पोहेकॉ. मिलिंद सोनवणे आणि पोहेकॉ. विकास पोहेकर यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन कारागृहात दाखल केले.

या कारवाईत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) आणि त्यांच्या पथकातील पोहेकॉ. सुनील पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

स्थानबद्ध गुन्हेगारावर यापूर्वीदेखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, सुधारणा न झाल्याने अखेर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत ही कठोर पावले उचलावी लागली.

जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी महत्त्वाची पावले उचलत गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा पोलिस प्रशासनाचा प्रयत्न सतत सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने