Top News

जळगावातील सेंट टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये २०० वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा

जळगाव, प्रतिनिधी I जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात नुकतीच स्थापन झालेली सेंट टेरेसा इंग्लिश स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तब्बल २०० झाडे लावण्यात आली, ज्यामध्ये कोरफड, बेल, कडूलिंब, फणस, आवळा, चिंच, तुलसी, हळद यासारख्या औषधी व पर्यावरणपूरक झाडांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर नितीन लड्ढा, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिस शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी फीत कापून विद्यालयाचे औपचारिक स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या समवेत वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, सिस्टर सिलीन यांनी मान्यवरांचे शाल, रोपटे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. 
विद्यार्थ्यांनी यावेळी सुंदर गीत सादर करून व रंगारंग नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्रशासन व पर्यावरण समितीने विशेष मेहनत घेतली. वृक्षारोपण उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होऊन भविष्यातही अशी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सेंट टेरेसा इंग्लिश स्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने