Top News

पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत 'स्वच्छतेचा वार सोमवार' उपक्रम राबणार – मीनल करनवाल

जळगाव जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये वृक्षारोपणासह शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांवर भर

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पंचायत सक्षमीकरण अभियानाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित ‘स्वच्छतेचा वार सोमवार’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रत्येक सोमवारी शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, “सततची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती या गोष्टींचा ग्रामीण विकासासाठी फार मोठा वाटा आहे. त्यामुळे या उपक्रमात वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती आणि जनभागीदारी या बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल.”

प्रत्येक सोमवारी ग्रामपंचायतींना मार्गदर्शक सूचना
गावपातळीवर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 'स्वच्छतेचा वार सोमवार' उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून, गावातील शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य केंद्रांचे परिसर स्वच्छ ठेवणे, झाडांभोवती संरक्षक वर्तुळे घालणे, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे, यावर भर दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हाच यामागचा उद्देश असल्याचेही करनवाल यांनी नमूद केले.

हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून पर्यावरण रक्षण आणि स्थानिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. नियमित स्वच्छता उपक्रमांमुळे रोगराईपासून संरक्षण होईल आणि ग्रामीण भागात स्वच्छतेची सवय रुजेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक सहभागाने उपक्रम यशस्वी होणार

‘स्वच्छतेचा वार सोमवार’ या उपक्रमात जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने