जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव रेल्वे स्टेशनजवळील मालधक्क्यावर बुधवारी (दि. १८ जून) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. क्रेनवरील लोखंडी हुक तुटून थेट डोक्यावर पडल्याने हा दुर्दैवी अपघात झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव कैलास रमेश माळी (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे असून, तो आपल्या कुटुंबासोबत पाळधी येथे राहत होता. कैलास हा मालधक्क्यावर हमाल म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.
नेहमीप्रमाणे कैलास बुधवारी सकाळी कामावर हजर झाला होता. मालधक्क्यावर क्रेनच्या साहाय्याने माल हलवण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेनवरील लोखंडी हुक तुटून थेट कैलासच्या डोक्यावर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो कोसळला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर अन्य कामगारांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच हमाल कामगार, नातेवाईक व गावकरी मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले होते.
कैलास हा अत्यंत कष्टाळू व शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर पाळधी गावात शोककळा पसरली आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा