जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I धरणगाव शहरातील आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून येथील नव्याने बांधण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी, दि. २० जून रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी, १८ जून रोजी दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली. त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, हा उपक्रम धरणगाव शहरासाठी आरोग्य सुविधा सुदृढ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले.
उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आता गंभीर आजारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, तसेच विविध रोगनिदान चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उपलब्ध असणार आहे.
कार्यक्रमात विविध राजकीय व प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
टिप्पणी पोस्ट करा