जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात असलेल्या एका बंद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धाड घालत संगणकाचे तीन संच चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १४ जूनच्या रात्री ते १५ जूनच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी मनीषा विशाल पाटील (वय ४३) यांनी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारीच एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असून तेथे विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घेतले जातात. १४ जून रोजी रात्री ८ वाजता इन्स्टिट्यूट बंद करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी दरवाज्याचा कडीकोयंडा कापून आत प्रवेश केला आणि तीन मॉनिटर, तीन सीपीयू, तीन की-बोर्ड, तीन माऊस व अन्य केबल्ससह संगणक साहित्य लंपास केले.
१५ जून रोजी सकाळी ७ वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधित कॅमेरा मालक बाहेरगावी गेल्यामुळे अद्याप फुटेज उपलब्ध झालेले नाही.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा