Top News

मोठी बातमी I अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले; २४२ जणांवर संकट – मेघानीनगर परिसरात भीषण दुर्घटना

अहमदाबाद | एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा आज सकाळी मेघानीनगर परिसरात भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळले असून, त्यानंतर त्याला प्रचंड आग लागली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या विमानात एकूण २४२ प्रवासी व क्रू मेंबर्स होते. कोसळल्यावर विमानातून दाट काळा धूर निघताना दिसून आला असून, स्थानिकांनी धाव घेत घटनास्थळी मदतकार्य सुरू केले.

📍 आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू
अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, बचावकार्य अधिक गतीमान करण्यासाठी एनडीआरएफचे पथक आणि बीएसएफचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

📍 विमानाची माहिती
हे विमान ११ वर्ष जुनं असून, दिल्लीहून अहमदाबादमार्गे लंडनला जाणार होतं. उड्डाणानंतर काही वेळातच यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

📍 आरोग्य सेवा सतर्क
अपघातानंतर अहमदाबाद शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय पथक युद्धपातळीवर कार्यरत असून जखमींना तात्काळ मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

📍 राजकीय हालचाली
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. पोलीस आयुक्तांनीही घटनेची पुष्टी केली असून, तपास आणि बचावकार्य एकत्र सुरू आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या दुर्घटनेवर केंद्रित झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अधिकृत अपडेट्सची प्रतीक्षा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने