Top News

चाळीसगाव तालुक्यात वाळू, गौण खनिज माफियांचा उच्छाद: लाखो रुपयाचा महसूल पाण्यात

चाळीसगाव, संदीप पाटील I  जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचा महसूल विभाग म्हणून चाळीसगाव तालुक्यचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. तालुक्याच्या आर्थिक प्रगतीचा मुख्य भाग आणि शेतकऱ्यांसाठी संजिवनी म्हणजे गिरणा नदी. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणजेच गिरणामाई अशी ओळख निर्माण झाली असतांनाच गेल्या काही महिन्यांपासून या गिरणामाईचे लचके तोडून स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम काही वाळू माफिया करत आहेत.
      चाळीसगाव तालुक्यातील रहिपुरी, जामदा शिवारातील गिरणा नदीपात्रातून शासनाच्या नियमाला डावलून हजारो, लाखो ब्रास वाळू उत्खनन सुरू असून वाळू आणि नदीमुळे सुजलाम सुफलाम असलेल्या गिरणा शिवारातील शेतकरी आणि शेतीला देशोधडीला लावण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे.शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून गिरणेचं वस्त्रहरण वाळू माफिया करत असून कायद्याची सर्रास पायमल्ली बघायला मिळत आहे. हे माफिया इतके मुजोर आहेत की कायदा तर दुरचं पण स्थानिक शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना देखील जुमानत नाही आहेत.
       दररोज संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोठमोठे डंपर आणि ट्रॅक्टर ने गिरणा नदीपात्रातून वाळूची लूट केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडतच आहे परंतु स्थानिक शेतकऱ्यांना देखील भविष्यात शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या वाळू माफियांना शासन ,प्रशासन कोणाचंच भय राहिलेले नसून राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. याविरोधात जामदा, रहिपुरी, भवाळी, भऊर, बोरखेडा, मेहुणबारे येथील स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जर का येत्या आठवडाभरात हे सगळं थांबलं नाही तर शेतकरी आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

*वाळूसोबत मुरुम आणि इतर गौण खनिज देखील अवैध उत्खनन सुरू आहे*

चाळीसगाव तालुक्यात वाळू तर अवैध उत्खनन सुरू आहेच परंतु त्यासोबतच विविध धरण, तलाव, नदी यामधुन मुरुम,गाळ असे विविध गौण खनिज देखील अवैध उत्खनन सुरू आहे. लाखो ब्रास अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन सुरू असून प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून देखील प्रशासन फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. जर का या सगळ्यांवर वेळीच कारवाई नाही झाली तर जनतेचा उद्रेक होऊन मोठं जन आंदोलन उभं राहील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने