Top News

जळगाव महापालिकेच्या गाडीतून गोमांसाची तस्करी? – चंदू अण्णा नगर परिसरात खळबळ

घटनास्थळी पोलिस व नागरिकांची मोठी गर्दी; प्रशासनाकडून कोणताही खुलासा नाही, महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील चंदू अण्णा नगर परिसरातून कचरा फॅक्टरी रोड मार्गे जाणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या एका वाहनातून गोमांसाची तस्करी होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. ८ जून) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. काही सतर्क तरुणांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी संबंधित वाहन अडवून चौकशी केली.

घटनास्थळावर काही वेळातच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तालुका पोलिस स्टेशनच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला.

प्राथमिक तपासात समोर आले की, जळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यातील एका गाडीमधून गोमांस नेत असल्याचा संशय बळावला आहे. या एका वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

महत्त्वाचे प्रश्न निर्माण
या प्रकरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत:

महानगरपालिकेच्या अधिकृत कचरा वाहतूक गाड्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांस कुठून आले?

जर गोमांस उचलले गेले असेल, तर ते कायदेशीर मान्यता असलेल्या कत्तलखान्यातून होते की बेकायदेशीर मार्गाने?

ही बाब महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीत होती का?


या प्रकरणामुळे सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीस तपास सुरू
तालुका पोलीस स्टेशनमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, वाहन चालक व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. महापालिकेच्या संबंधित विभागांना चौकशीसाठी नोटिसा देण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी अधिकृत खुलासा अद्याप महापालिका प्रशासन किंवा पोलिसांकडून करण्यात आलेला नाही. मात्र, ही घटना शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने