Top News

१५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक चोरीप्रकरणी पोलिसांची मोठी कामगिरी; शिरपूरहून १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक


भुसावळ, रजनीकांत सोनवणे I गायत्री नगरमधील एका गोदामातून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरट्यांनी चोरी केलेला सुमारे १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल शिरपूर येथील खाजगी गोदामात लपवून ठेवला होता. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला असून, या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. १५ जून रोजी मध्यरात्री, नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गायत्री नगरमधील राजस्थान मार्बल जवळील पत्र्याच्या गोदामाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला होता. त्याठिकाणाहून एकूण ३५ हजार रुपये किमतीचे फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तरीत्या सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्स परिसरातील एका खाजगी पत्र्याच्या गोदामावर छापा टाकला. तेथून चोरीस गेलेला १८ लाख ८० हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांना अटक
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यु बोराडी, ह.मु. गणेश कॉलनी, शिरपूर) आणि जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्था. गु. शाखेचे पो. नि. संदीप पाटील व बाजारपेठ पो. स्टे.चे पो. नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
उपविभागीय पोलीस अधिकारी उमाकांत पाटील, पो. हे. कॉ. विजय नेरकर, संदीप धनगर, पो. शि. सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा, स्था. गु. शाखेचे पो. उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सहा. फौजदार रवी नरवाडे, पो. हे. कॉ. गोपाळ गव्हाळे, मुरलीधर धरगर, संदीप चव्हाण, प्रविण भालेराव, चालक भरत पाटील तसेच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो. हे. कॉ. महेश चौधरी आणि पो. शि. राहुल भोई यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला.

या कारवाईमुळे भुसावळ परिसरात वाढत्या चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल टि. वाघ हे करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने