जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील शनिपेठ पोलिसांनी मोहन टॉकीजजवळील असोदा रोडवरील पिवळ्या भिंतीच्या परिसरात कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग केंद्राचा पर्दाफाश केला. या छाप्यात एकूण ६१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या गॅस रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान २८ व्यावसायिक (त्यापैकी १० भरलेले, १८ रिकामे) आणि ३३ घरगुती (१३ भरलेले, १० रिकामे) अशा प्रकारचे सिलिंडर सापडले. याप्रकरणी वाहन चालक आदेश राजू पाटील, राहुल नारायण सोनवणे व राकेश नारायण सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली. या पथकात शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील, गजानन वाघ, योगेश साबळे, अमोल वंजारी, निलेश घुगे, विक्की इंगळे, नवजीत चौधरी, पराग दुसाने यांचा समावेश होता.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा