गोपनीय माहितीच्या आधारे अकोला जिल्ह्यातून पाच जणांना अटक; शस्त्रांसह इनोव्हा गाडी जप्त
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने गस्तीदरम्यान गोवंश तस्करी व संभाव्य दरोड्याच्या तयारीचा मोठा कट उधळून लावत धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून अन्य चार आरोपी फरार आहेत. घटनास्थळी कारवाई करत असताना पोलिसांवर वाहनाद्वारे जीवघेणा हल्लाही करण्यात आला होता.
गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली
दि. १५ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, श्रेपोउनि. अनिल जाधव व वाहन चालक पोहेकॉ. दर्शन ढाकणे हे गस्तीसाठी भुसावळमार्गे मुक्ताईनगर उपविभागात गेले असता, कुंड गावाजवळ चार संशयित इसम एक इनोव्हा कारमधून उतरून घराकडे जाताना आढळले. पोलिसांना पाहताच आरोपी इनोव्हा कारमधून नागपूर महामार्गावरून भरधाव निघाले.
जीवघेण्या प्रकारानंतर राज्यभर नाकाबंदी
इनोव्हा चालकाने शासकीय वाहनाला कट मारून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ मलकापूर, नांदुरा, बुलढाणा व अकोला नियंत्रण कक्षांशी संपर्क साधून नाकाबंदीचे आदेश दिले.
रात्री ३.४० वाजता नाकाबंदी यशस्वी
दि. १६ जून रोजी पहाटे ३.४० वाजता रिधोरा (ता. बाळापूर, जि. अकोला) येथे एनएचएआय कार्यालयाजवळ ट्रक आडवा लावून अकोला गस्ती पथकाने नाकाबंदी केली. इनोव्हा कार थांबली मात्र त्यातील चार इसम पळून गेले. जुने शहर पोलीस स्टेशन अकोलाचे पोलीस अधिकारी रविंद्र करणकर व सहकाऱ्यांनी पाठलाग केला, परंतु ते फरार झाले. मात्र कार चालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. हैदरपुरा, अकोला) यास अटक करण्यात आली.
दरोड्याचा कट उघड; शस्त्रसाठा जप्त
इनोव्हा कारची झडती घेतली असता एक काळ्या रंगाचा चोरीचा बैल, तलवार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉड, दोर, कपडे व दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. संपूर्ण पंचनामा करून साहित्य जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथे जमा करण्यात आले.
फरार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1. सैय्यद फिरोज ऊर्फ अनडूल (रा. अजुमपुरा, बाळापूर)
2. अफजल सैय्यद (रा. काली घाणी पुरा, बाळापूर)
3. इमरान (रा. बिकुंड नदी, कसारखेडा, बाळापूर)
4. तन्नु ऊर्फ तन्वीर (रा. काली घाणी, बाळापूर)
5. अफरोज खान ऊर्फ अप्या (रा. कुबा मशिद, अकोला)
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पोलीस पथकाचे अभिनंदन
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत संदीप पाटील, शरद बागल, अनिल जाधव, दर्शन ढाकणे, रवि नरवाडे, सुनिल दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, श्रीकृष्ण देशमुख, भरत पाटील, तसेच अकोल्याचे रविंद्र करणकर, प्रमोद शिंदे व स्वप्नील पोधाडे यांचा मोलाचा सहभाग होता.
पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे यशस्वी कारवाईबद्दल अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा