Top News

80 विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविणारी जिल्हा परिषदेची तत्परता; के.एस.टी. उर्दू शाळेवर प्रशासनाचा ताबा, मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १०वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांचे अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळवणे अडचणीत आले असताना, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले.

संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा व शकील शेख मुसा हे शाळा सोडल्याचे दाखले देण्यास टाळाटाळ करत होते. सतत अडथळे निर्माण करून त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण केली होती. याबाबतची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (भा. प्र. से.) यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ संवेदनशीलता दाखवत गंभीर दखल घेतली.

करनवाल यांनी गटशिक्षण अधिकारी सरला पाटील, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण व खलील पठाण यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून शाळेत पाठवले. मात्र प्रभारी मुख्याध्यापकाने शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून शासकीय पथकास आत प्रवेश नाकारला. हा प्रकार गंभीर मानत करनवाल यांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून पोलीस सहाय्यता मागितली.

पोलीस प्रशासनानेही त्वरित प्रतिसाद देत शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवार, २८ जून रोजी पोलिस संरक्षणात शासकीय पथक पुन्हा शाळेत दाखल झाले. कार्यालयात कुलूप असल्याने अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी सरला पाटील यांनी एकतर्फी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले तयार करून वाटप केले.

या प्रकारामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क सुनिश्चित करण्यासाठी घेतलेली ठोस भूमिका ही समाजासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरली आहे. ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्याची ही कारवाई शिक्षणव्यवस्थेतील अडथळ्यांविरोधात प्रभावी पावले उचलल्याचे स्पष्ट उदाहरण म्हणता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने