जिल्हा प्रशासनाचा सावधानतेचा इशारा; शेळगाव बॅरेजमधूनही मोठा विसर्ग
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I यंदाच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसानंतर हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हतनूर धरणाचे ४६ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या दरवाजांतून सध्या अंदाजे २० हजार १३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे तापी नदीच्या काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून हतनूर धरणात पाण्याची आवक सुरु असून, सुरुवातीला दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. परंतु, विदर्भासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीमार्फत धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवेश झाला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ४६ पैकी १२ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. यानंतर रात्री १० वाजता आणखी चार दरवाजे उघडावे लागले. मात्र, शनिवारी सकाळी पाण्याची आवक थोडी कमी झाल्यामुळे सहा दरवाजे बंद करण्यात आले. सद्यस्थितीत १० दरवाजे उघडे असून विसर्ग सुरू आहे.
शेळगाव बॅरेजमधून ५२ हजार क्यूसेकहून अधिक विसर्ग
दरम्यान, हतनूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे तापी नदीवर उभारलेल्या शेळगाव बॅरेजमध्येही पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने या बॅरेजचे सात दरवाजे दोन मीटरने उघडले असून, तेथून जवळपास ५२ हजार ७६५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तापी नदी दुथडी भरून वाहती
हतनूर आणि शेळगाव येथून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तापी नदी दुथडी भरून वाहताना दिसत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
साठा अजूनही ६२ टक्क्यांवर
अद्याप हतनूर धरणात ६२.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. भविष्यात पाण्याची आवक कमी झाल्यास विसर्गात कपात करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता एस. जी. चौधरी यांनी दिली.
नागरिकांना प्रशासनाचा इशारा
तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी धरण व बॅरेजमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत दक्षता घ्यावी. अनावश्यकपणे नदीपात्रात जाऊ नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा