जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्य शासनाच्या पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी जळगावात जोरदार निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून शासनाच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
"मराठी माती, मराठी भाषा", "हिंदी सक्ती हद्दपार", "मराठी शाळा, मराठी अभ्यास" अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनादरम्यान शासनाच्या निर्णयाचे प्रतीकात्मक प्रती जाळण्यात आले व संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
या वेळी मनसेचे शहर प्रमुख आणि शिवसेनेचे (उ.बा.ठा.) पदाधिकारी, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी सांगितले की, लहान वयातील विद्यार्थ्यांवर भाषेची सक्ती करणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक स्वातंत्र्यावर घाला आहे. महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेतच व्हायला हवे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
शालेय अभ्यासक्रमात मातृभाषेला प्राधान्य देणे गरजेचे असून कोणतेही धोरण हे स्थानिक भाषिक अस्मिता आणि संस्कृतीच्या विरोधात असता कामा नये, असा ठाम संदेश आंदोलनातून देण्यात आला. शासनाने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, संदीप मांडोळे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर, राहुल चव्हाण, अनिताताई कापुरे, नेहा चव्हाण, लक्ष्मीताई भील, तसेच राहुल सोनटक्के, विशाल सोनार, साजन पाटील, अविनाश जोशी, प्रदीप पाटील, रोहित माळी, मनोज लोहार, विलास सोनार, राहुल चौधरी, भूषण पाटील, दिनेश कलार, मंगेश भावे, शुभम सैनी, नौशांक चौधरी, लोकेश ठाकूर यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा