हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असल्याची चर्चा; बदलीमागील कारणांवर अद्याप अधिकृत मौन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत असतानाच, या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे. पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी आय. जी. जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक (मामा) असल्याची माहिती पुढे येत असून, त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमागे प्रकरणाशी संबंधित संभाव्य हितसंबंध असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गृह विभागाने कोणतेही स्पष्ट कारण न देता, बदलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निर्णयामागील पार्श्वभूमीबाबत अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत. काही सूत्रांच्या मते, सुपेकर यांचा हगवणे कुटुंबाशी असलेला जवळचा संबंध, आणि त्यावरून त्यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला संशय, हे यामागचं एक मुख्य कारण असू शकतं.
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरण अजूनही चर्चेत असून, न्याय मिळावा अशी मागणी सोशल मीडियावर आणि जनतेतून होत आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका, चौकशीतील पारदर्शकता आणि आता झालेली ही बदली — या सगळ्यांचा एकत्रित परिणाम राज्यातील प्रशासनावर मोठा दबाव टाकतो आहे.
या प्रकरणात पुढे काय वळण येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा