Top News

"लाडकी बहिण रस्त्यावर प्रसूत होतेय, त्याचे काय?" – संजय राऊत यांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांचा राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर व पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर कठोर सवाल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडली असून सामान्य जनतेला मूलभूत आरोग्य सुविधा मिळण्यात गंभीर अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागल्याच्या धक्कादायक घटनेवरून सरकारवर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

"गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्या उपस्थितीतच त्यांच्या जिल्ह्यात महिलेला रस्त्यावर बाळंतपण करावं लागतं, यावर ते काय मत व्यक्त करतात?" असा थेट सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी राज्य सरकारची आरोग्य व्यवस्था ढासळली असल्याचा आरोप केला.

संजय राऊत म्हणाले, "लाडकी बहिण म्हणून महिलांचा उल्लेख करणाऱ्या सरकारच्या राज्यातच जर अशा प्रकारे महिलांची परवड होत असेल, तर ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी आता या प्रकारावर उत्तर द्यावं."

राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील प्रशासन आणि आरोग्य विभागावरही टीकेची झोड उठू शकते.

दरम्यान, संबंधित घटनेबाबत अजूनही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने