हैदराबाद, वृत्तसंस्था – शहरातील चारमिनार भागात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. एका तीन मजली इमारतीतील दागिन्यांच्या दुकानात अचानक आग लागल्याने या दुर्घटनेत एकूण १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान बालकांचाही समावेश असून, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही आग लागली. चारमिनारच्या बाजूला असलेल्या दागिन्यांच्या दुकानात सर्वप्रथम आग लागली असून ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून सुरू झाली. ती पाहता पाहता संपूर्ण तीन मजली इमारतीमध्ये पसरली. घटनास्थळी त्वरीत ११ अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि ७० जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.
या भीषण दुर्घटनेत प्रल्हाद, मुन्नी, राजेंदर मोदी, समुत्रा, शीतल, वर्षा, पंकज, रजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे हमेय, इद्दू, ऋषभ, आरुषी, इराज आणि प्रथम या निरागस बालकांचाही यात समावेश आहे. विशेषतः प्रथम हा केवळ एक वर्षांचा होता, इराज दोन वर्षांचा आणि आरुषी केवळ तीन वर्षांची होती. त्यांच्या मृत्यूने वातावरण अधिकच विषण्ण झाले आहे.
या आगीत आणखी ९ जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ही घटना समजताच भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “ही घटना ऐकून मला प्रचंड धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सध्या पोलिस व अग्निशामक विभागाने आगीचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही दुर्घटना टाळता आली असती का, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत असून सुरक्षा उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा