Top News

मोठी बातमी I भारत-पाकिस्तान युद्धविरामावर ऐतिहासिक सहमती : परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री यांची अधिकृत घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था I भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांनी अखेर युद्धविरामावर पूर्ण आणि तात्काळ अंमलबजावणी करण्यावर सहमती दर्शवली आहे. ही ऐतिहासिक घोषणा भारताचे परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

परराष्ट्र मंत्री मिस्त्री यांनी सांगितले की, पाकिस्तानचे डीजीएमओ (Director General of Military Operations) यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला की, सायंकाळी ५ वाजल्यापासून युद्धविराम लागू करण्यात येईल. यानुसार, दोन्ही देशांनी सीमारेषेवर शांतता आणि संयम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, पुढील सहकार्याच्या अनुषंगाने भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चर्चा करतील, असेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले. या चर्चेमध्ये पुढील लष्करी संवाद आणि नियंत्रण रेषेवरील स्थितीबाबत तपशीलवार चर्चा होणार आहे.

या घोषणेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सामाजिक माध्यमावर पोस्ट करत भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविल्याचे जाहीर केले. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना "युद्ध टाळून शांततेचा मार्ग स्वीकारणे हा दोन्ही देशांसाठी सकारात्मक पाऊल आहे," असे म्हटले.

या युद्धविरामामुळे सीमेवर वाढलेला तणाव कमी होण्याची आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकींमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्यामुळे हे युद्धविरामाचे पाऊल अत्यंत निर्णायक मानले जात आहे.

पुढील घडामोडीकडे देशाचे लक्ष लागले असून, १२ मे रोजीच्या चर्चेवर भविष्यातील शांततेचा मार्ग अवलंबून राहणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने