जळगाव महानगरपालिकाचा भोंगळ कारभार
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. त्यांच्या हातगाड्या, साहित्य ताब्यात घेऊन दंड आकारला जातो. मात्र याचवेळी रस्त्यावर बिनधास्तपणे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे ‘मनपाच्या कारवाईत दुजाभाव होत आहे का? तसेच’पोलिसांच्या वाहतूक शाखेने झोपेचे सोंग घेतले आहे का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये हातगाडीवर व्यवसाय करणारे लोक आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र महानगरपालिकेकडून त्यांच्यावर सातत्याने कारवाई होत आहे. त्यांचे साहित्य जप्त करून दंड आकारला जातो. यामुळे गरिबांच्या पोटावर लाथ मारल्याचे चित्र उभे राहत आहे. याउलट, शहराच्या विविध भागांमध्ये – विशेषतः सिंधी कॉलनीसारख्या गर्दीच्या भागात – रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने दिवसेंदिवस उभी राहत असून त्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परंतु महानगरपालिका याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील मुख्य चौकातच पाहिले तर, दोन्ही बाजूंनी चारचाकी वाहने पार्क करून ठेवण्यात आलेली दिसतात. या परिसरात अतिक्रमणाच्या नावाखाली हातगाड्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केले जाते, मात्र मोठ्या गाड्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे – जळगाव महानगरपालिका काय फक्त दुर्बलांवरच अंमलबजावणी करते? नियम सर्वांसाठी समान असायला हवेत, मग ते हातगाडीवाले असोत की वाहनधारक. त्यामुळे नागरिक आता विचारत आहेत की, अशा दुजाभावाच्या कारवाईवर कोण लक्ष ठेवणार? आणि वाहनधारकांवरही नियम लावले जाणार की नाही?
यावर प्रशासनाने तातडीने उत्तर देणे गरजेचे असून, पारदर्शक आणि समान न्याय देणारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा