जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I विनापरवानगी आणि अपूर्ण नियोजनामुळे उभारलेल्या गतीरोधकाने एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे. पाच महिन्यांच्या बालिकेचा या धोकादायक गतिरोधकामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता कानळदा – चोपडा रस्त्यावरील आमोदा-घार्डी रस्त्यावर घडली.
देवगाव येथील संदीप संजय सोनवणे हे आपल्या पत्नीला – ज्योती संदीप सोनवणे यांना घेण्यासाठी कोळन्हावी येथे गेले होते. पत्नीला घेवून परत येताना आमोदा-घार्डी गावाजवळ त्यांनी दुचाकीवरून प्रवास सुरू केला. मात्र, रस्त्यावरच विनापरवानगी बांधण्यात आलेल्या आणि कोणतीही सूचना नसलेल्या गतिरोधकावर त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाला.
या अपघातात त्यांच्या पत्नीच्या हातात असलेली पाच महिन्यांची चिमुकली – गायत्री संदीप सोनवणे ही रस्त्यावर पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे संपूर्ण सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी शुक्रवारीही आणखी एक अपघात झाला असून एका दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या गतिरोधकाच्या धोकादायकतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित विभागाने परवानगी न घेता उभारलेल्या आणि नियमबाह्य पद्धतीने बनवलेल्या गतिरोधकांविरोधात कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी गतिरोधक अपूर्ण डिझाइनचे, संकेतविना आणि अचानकपणे रस्त्यावर उभारण्यात आलेले असून, त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष?
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आवाज उठवत, अशा जीवघेण्या गतिरोधकांच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे. "किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार?" असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा