Top News

ब्रेकिंग I जळगावमध्ये ३० वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

हॉटेल कमल पॅराडाइजजवळ रात्रीची घटना; धारदार शस्त्राने हल्ला करून आकाश भावसारचा खून, चौघांवर संशय

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात पुन्हा एकदा खूनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हॉटेल कमल पॅराडाइजजवळ एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार असून तो जळगावच्या अशोक नगर परिसरात राहत होता. ही घटना शनिवारी (२ मे) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, आकाश भावसार हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. शनिवारी रात्री हॉटेल ए-वन जवळ पत्नीच्या नातेवाईक असलेल्या काही तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने तो जागीच रक्तबंबाळ झाला.

स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने भावसार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मयताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून चौघा संशयित तरुणांची नावे समोर आली आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून हल्लेखोरांचा लवकरच छडा लावण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने