ड्राय डेचं गांभीर्य कुठं? जळगावात नियम धाब्यावर
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I १ मे, महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन व कामगार दिन असून, राज्य शासनाने या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर केला आहे. मात्र, जळगाव शहरात अनेक भागांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कायद्याचा भंग करत काही दुकानदारांनी आणि खासगी दारू विक्रेत्यांनी सर्रासपणे दारूची विक्री सुरू ठेवली असून, पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरातील रामानंद नगर, बालमंदिर परिसर, एमआयडीसी भाग तसेच रेल्वे स्टेशन परिसरात अनेकांनी ‘गुपचुप’ पद्धतीने दारू विक्री चालू ठेवली आहे. काही ठिकाणी बंद दरवाजामागे तर काही ठिकाणी गुप्त डिलिव्हरीच्या माध्यमातून ही विक्री सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, ड्राय डे असल्यामुळे अनेकांनी याचा गैरफायदा घेत दारूचे दरही वाढवले असल्याची माहिती मिळते.
नागरिकांमध्ये नाराजी
महाराष्ट्र दिनी, जेव्हा संपूर्ण राज्य एकात्मतेचे व सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवतो, तेव्हा असे प्रकार म्हणजे कायद्याला थट्टा ठरते. अनेक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रशासन काय म्हणतं?
या संदर्भात जळगाव उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिस प्रशासन यांच्याकडे विचारणा केली असता, “कारवाई सुरू आहे आणि संबंधित ठिकाणांवर गुप्त पथके पाठवण्यात आले आहेत,” असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मोठी कारवाई झाली नसल्यामुळे यावर संशय व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा आदर्श ठेवला जाणे अपेक्षित असताना, जळगावात दिसणारे हे चित्र निराशाजनक आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा