जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज पक्षाच्या प्रदेश पातळीवरून पूर्व विभाग, पश्चिम विभाग व जळगाव महानगरासाठी नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अखेर आज या यादीवर शिक्कामोर्तब करत जामनेरचे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते चंद्रकांत बाविस्कर यांची जिल्ह्याच्या पूर्व विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पश्चिम विभागासाठी डॉ. राधेश्याम चौधरी, जे पूर्वी लोकसभा क्षेत्रप्रमुख म्हणून कार्यरत होते, यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वीही महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडलेली असून त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
या निवडीनंतर पक्षाने सामाजिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला असून दोन मराठा व एक गुजर या समाजघटकांतील नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या दीर्घकालीन कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. चंद्रकांत बाविस्कर हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनी जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
पक्षातील या नव्या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग येणार असून आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीचा भाग म्हणून या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत..
टिप्पणी पोस्ट करा