Top News

मोठी बातमी I ड्रग्सचा सुळसुळाट उघडकीस : खडसे विधानभवनात उघड करणार गुपितं!

खडसेंचा स्फोटक आरोप : जळगाव पोलिस, सत्ताधाऱ्यांच्या मूकसंमतीने वाढतोय ड्रग्जचा विळखा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेला ड्रग्सचा विळखा गंभीर स्वरूप धारण करू लागला असून, यामागे पोलीस प्रशासन व काही सत्ताधारी गुपचूप हात धुत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. जिल्ह्यातील ड्रग्स व्यवहारांची संपूर्ण कुंडली विधानभवनात उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

खडसे म्हणाले की, “ड्रग्सचा सुळसुळाट जिल्ह्यात वाढत असून युवकांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली? यामागे कोणाचे हात आहेत? हे सर्व स्पष्टपणे लोकांसमोर येणं आवश्यक आहे. यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याची ठोस माहिती मिळाली आहे.”

याचप्रमाणे, एका सत्ताधारी पक्षाच्या खास स्वीय सहाय्यकाचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा धक्कादायक दावा खडसे यांनी केला आहे. “सत्ताधाऱ्यांचा एक जवळचा स्वीय सहाय्यक थेट या व्यवहारात सहभागी आहे. त्याला अभय दिलं जातंय. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे,” असे खडसे म्हणाले.

तसेच, त्यांनी पोलिसांवर निशाणा साधत म्हटलं की, “दोषींवर कारवाई होत नाही, उलट त्यांना संरक्षण दिलं जातं. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा सगळा गोरखधंदा बिनधास्तपणे सुरु आहे.”

येत्या अधिवेशनात संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत सर्व नावे विधानभवनात मांडणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात व पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने