Top News

बारावीच्या निकालानंतर नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या : ममुराबादमध्ये हृदयद्रावक घटना

दोन दिवसांत दुसरी आत्महत्या; पालक आणि शिक्षण क्षेत्रात चिंता

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून ममुराबाद (ता. जळगाव) येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. ५ मे) दुपारी उघडकीस आली. ऋषिकेश दिनेश पाटील असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता.

ऋषिकेश पाटील याने बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली होती. सोमवार, ५ मे रोजी दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला. यात त्याला ४९ टक्के गुण मिळाले. हे गुण त्याच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याने तो तीव्र नैराश्यात गेला. या नैराश्यातूनच त्याने दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरात कोणीच नसल्याने ही घटना उशिरा लक्षात आली. ऋषिकेशच्या आईने ही दुर्दैवी घटना पाहून आरडाओरड केली आणि त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर ऋषिकेशला तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या वेळी रुग्णालयात झालेला आक्रोश काळजाला चटका लावणारा होता. ऋषिकेशचा मोठा भाऊ सध्या फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ममुराबाद गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईक, मित्रमंडळी व गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

विशेष म्हणजे, याच दिवशी एरंडोल तालुक्यातील एका विद्यार्थ्यानेही कमी गुणांमुळे पाचोरा येथे बहिणीच्या घरी आत्महत्या केली होती. दोन दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून, त्यामुळे पालक आणि शिक्षण क्षेत्रात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

'गुण महत्त्वाचे, पण जीवन अधिक महत्त्वाचे' – हा संदेश पुन्हा एकदा या दुर्देवी घटनांनी अधोरेखित केला आहे. विद्यार्थ्यांनी अपयश स्वीकारून त्यातून शिकण्याची गरज आहे, तसेच पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद साधत त्यांचे मानसिक बळ वाढवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने